नाशिक: नेपाळ येथील बस दुर्घटनेतील २५ भाविकांचे मृतदेह विशेष विमानाने जळगाव विमानतळावर रात्री साडेआठच्या सुमारास आणण्यात आले. ओळख पटवून मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले. शुक्रवारी नेपाळमध्ये बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २७ भाविकांचा मृत्यू तर, १६ जण जखमी झाले. या अपघातानंतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या जखमींच्या मदतीसाठी काठमांडू येथे गेल्या होत्या. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. बागमती प्रांतातील रुग्णालयात जिल्ह्यातील २७ मृतांचे विच्छेदन करण्यात आले. भरतपूर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली गेली. वायूदलाच्या विशेष विमानाने खडसे या २५ मृतदेह आणि काही जखमींना घेऊन रात्री साडेआठच्या सुमारास जळगाव विमानतळावर दाखल झाल्या.
विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. विमानतळावर २५ विशेष रुग्णवाहिका आधीच उपस्थित होत्या. सोबत आरोग्य पथकही होते. आरोग्य पथकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, मोहाडी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे, डॉ. विजय कुरकुरे यांचा समावेश आहे. विमानतळावर भुसावळ तालुक्यातील मृत भाविकांचे कुटुंबीय व नातेवाइक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर; गोदावरी, दारणा, कादवा नद्या दुथडी भरून
ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. नेपाळ देवदर्शनासाठी गेलेल्या तीनपैकी पहिल्या बसमधील सर्व भाविक सुखरूप असून, त्यांना गोरखपूर येथून विशेष रेल्वेने जळगाव येथे आणण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी दिली. बागमती प्रांतातील रुग्णालयात जिल्ह्यातील २७ मृतांचे विच्छेदन करण्यात आले. भरतपूर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली गेली. एकूण २७ मृतांमध्ये १६ महिला, तर ११ पुरुष आहेत.