नाशिक : मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे स्वीय सहायक (पीए) असल्याच्या भूलथापा देत शासकीय नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगार युवकांकडून सुमारे ७१ लाख ५० हजार रुपये उकळणाऱ्या प्रकाश कदम या भामट्याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. लासलगाव परिसरातील विंचूर फाटा येथे सापळा रचून गुंडाविरोधी पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
याबाबत संकेत कोटकर (नैताळे, निफाड) या युवकाने तक्रार दिली होती. शहरातील पंचवटी महाविद्यालयात कोटकर शिक्षण घेत असून अन्य विद्यार्थ्यांसह तो भाडेतत्वावरील खोलीत वास्तव्यास आहे. एका मित्राच्या माध्यमातून संशयित कदम हा २०२३ मध्ये कोटकर याच्या संपर्कात आला होता. संशयित कदमने राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे स्वीय सहायक असल्याची बतावणी केली. अनेक बड्या व्यक्तींशी आपल्या ओळखी आहेत. शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत संशयिताने कोटकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांकडून ७१ लाख ५० हजार रुपये घेतले. संशयिताने ही रक्कम धनाकर्षाद्वारे घेतली होती. संशयिताने पत्नी संगिता कदम उर्फ संगिता केदारे यांच्या बँक खात्यात या रकमा स्वीकारल्या. सुरुवातीला खातेनिहाय नोकर भरतीनुसार संशयिताने तरूणांना अर्ज भरायला लावले. मात्र कुठेही त्यांचे काम झाले नाही. तीन वर्ष उलटूनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगार युवकांनी पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा केला. तेव्हा संशयिताने टोलवाटोलवी केली. यात ७१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला.
या गंभीर गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला सूचित केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित प्रकाश कदम हा फरार होता. स्वत:च्या घरी न राहता तो कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात फिरत असल्याने त्याची माहिती काढणे अवघड झाले होते. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली. संशयित कदम हा लासलगाव भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर गुंडाविरोधी पथकाचे अमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व विजय राठोड यांचे पथक तिकडे रवाना झाले. स्थानिकांकडून माहिती घेत विंचूरफाटा येथे सापळा रचून संशयित प्रकाश कदम (४७, बदलापूर, ठाणे) याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, ,राजेश राठोड, सुनिता कवडे यांंनी पार पाडली.