लोकसत्ता वार्ताहर

धुळे – आलु अर्जुनचा पुष्पा चित्रपट त्याच्या वेगवान कथानक, गाणी, हाणामारी आणि त्यात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या कल्पनांमुळे चांगलाच गाजला. या चित्रपटातील कल्पनांचा वापर अनेक जणांकडून प्रत्यक्षातही केला जात आहे. धुळे जिल्ह्यात पोलिसांनी एका मालमोटारीची तपासणी केली असता पुष्पातील आयडियाचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. ते पाहून पोलीसही चक्रावले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना अवैध व्यवसाय रोखण्यासाठी धडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पथके कार्यान्वित झाली आहेत. मुंबई-आग्रा महामार्गाने मालमोटारीतून लाखो रुपयांची अवैध दारु शिरपूरच्या दिशेने नेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोनगीरच्या दिशेने जाणारी दोन वाहने अडवली. मालमोटारीची तपासणी केली असता त्यात सिमेंटचे पत्रे ठेऊन त्याखाली चोरकप्पा केल्याचे आढळून आले. चोरकप्प्यात १६ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा लपविण्यात आला होता.

आणखी वाचा- पनवेल : सिडकोच्या जमिनीवर राडारोडा टाकणाऱ्या पाच डंपरवर कारवाई

पोलिसांनी मद्याची ३२० खोके, दोन वाहने, असा ३६ लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी प्रदूम्न यादव (२५, रा.गांधीनगर, कांदिवली), विरेंद्र मिश्रा (३५, रा. कामन रोड, वसई), श्रीराम पारडे (३२, सुचत नाका कल्याण पूर्व), राकेश वर्मा (६०, रा.सविनाखेडा माताजी मंदिराजवळ, उदयपूर) यांच्याविरुध्द पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, राजेंद्र गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader