नाशिक : धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी-ब्रम्हगिरी रोपवे प्रकल्पाने जैवविविधता आणि अंजनेरी पर्वतावरील गिधाडांचा अधिवास धोक्यात येणार आहे. याकडे लक्ष वेधत प्रस्तावित रोपवेला पर्यावरणप्रेमी व स्थानिक ग्रामस्थांनी जटायू पूजन करीत विरोध दर्शविला. या प्रकल्पाने अंजनेरी आणि ब्रम्हगिरीतील पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन भारतीय वन्यजीव मंडळाने करावे. परस्पर हा प्रकल्प पुढे रेटल्यास विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत निसर्गप्रेमी व सहकारी एकत्रितपणे विरोधात प्रचार करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे आग्रही आहेत. या प्रकल्पाची व्यवहार्यता आणि आराखड्याचे काम झाल्यानंतर केंद्र शासनाने प्रस्तावित प्रकल्पाच्या निविदा मागविल्या असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणप्रेमी संघटनांची हुतात्मा स्मारक येथे बैठक होऊन विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. यावेळी शेखर गायकवाड अरविंद निकुंभ, संदीप भानोसे, रमेश अय्यर, भारती जाधव, जयेश पाटील, प्रतीक्षा कोठुळे, विशाल देशमुख, अंबरीश मोरे, वैभव देशमुख यांसह ग्रीन रिव्होल्युशन, वृक्षवल्ली आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत निश्चित झाल्यानुसार रविवारी सकाळी निसर्गप्रेमींनी ब्रम्हगिरी येथे जटायू पूजन करीत रोपवे प्रकल्पाविरोधात अभियानास सुरुवात केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा… जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात
पर्वतीय प्रदेशातील वाहतूक सुलभतेसाठी असणाऱ्या पर्वतमाला योजनेचा खासदारांकडून गैरवापर करून केंद्र सरकारची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमीनी केला. अतीदुर्मिळ जेवविविधतेसाठी प्रसिद्ध अंजनेरी पर्वताला अभयारण्य घोषित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. याचवेळी खासदारांकडून रोपवे सारख्या जैवविविधतेस धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्पाचा आग्रह योग्य नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरवर्षी लाखो भाविक ब्रम्हगिरीला पायी प्रदक्षिणा घालतात. पर्यटन वाढीसाठी निसर्गाचे नुकसान करून रोपवेची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंजनेरीची जैवविविधता, ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी मेटघर ग्रामस्थ, त्र्यंबकवासी, पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. अंजनेरी पर्वतावर गिधाडांचा अधिवास आहे. या प्रकल्पाने तोही धोक्यात येईल. वन विभाग आणि वन्य जीव मंडळाला डावलून रोप वेचे काम रेटले गेले तर हे विभाग तातडीने बंद करून त्यावर होणाऱ्या खर्चात बचत करावी, असे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे. या संदर्भात खासदार गोडसे यांच्यासह पालकमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री व केंद्रीय पर्यावरणमंत्री व पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे. निसर्गप्रेमींचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सर्व निसर्गप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी, आप्तस्वकीय या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांच्या विरोधात प्रचार करतील, असा इशारा देण्यात आला आहे. ब्रम्हगिरी पायथ्याशी झालेल्या आंदोलनावेळी आनंद आखाड्याचे गिरीजानंद सरस्वती महाराज, मेटघरचे सरपंच झोले, प्रकाश दिवे, कैलास देशमुख, डॉ. संदीप भानोसे, टीम वृक्षवल्ली, पांजरपोळ ग्रुप आदी दोनशेपेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
हेही वाचा… उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील इंधन पुरवठा ठप्प; ग्रामस्थांकडून टँकरची तोडफोड
त्र्यंबकमध्ये वन जमिनींवर आघात
नाशिक शहराप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातही शेकडो वन जमिनी विविध क्लुप्त्या लढवत, पळवाटा शोधून मागील काही वर्षात अराखीव क्षेत्रात परावर्तीत झाल्याची साशंकता एका पर्यावरणप्रेमीने संकलित केलेल्या माहितीतून निर्माण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे, यात पेगलवाडी, अंजनेरी, मुळेगाव, पहिने, मेटघर किल्ला आणि आसपासच्या भागातील वन जमिनींचा समावेश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात वन विभागाने काही जागा महसूल विभागाला तात्पुरत्या स्वरुपात हस्तांतरीत केल्या होत्या. यातील बहुतांश जागा विहित प्रक्रिया पार न पाडता भूमाफियांनी गिळंकृत केल्याचा आक्षेप आहे. वन विभागाशी संबंधित अशा शंभरहून अधिक सर्व्हे क्रमांकांच्या नोंदीच गायब आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक राजकीय नेते मंडळींनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. या भागात शैक्षणिक संस्था, रिसॉर्ट, हॉटेल्स आदींचे वाढते प्रस्थ त्याचे निदर्शक आहे. रोप वे प्रकल्पाने परिसरातील शिल्लक वन क्षेत्रावर आघात केला जात असल्याची धास्ती निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.