लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम महायुतीला संपूर्ण राज्यात भोगावे लागतील, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
महायुतीकडून भुजबळ यांना नाशिकच्या जागेवर उमेदवारी देण्याचा विचार होत आहे. या पार्श्वभूमीवर, सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. भुजबळ यांना उमेदवारी देत महायुती मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळत आहे काय, असा प्रश्न करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली, इतर जातींना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचे काम केले, असा आरोप करण गायकर यांनी केला.
आणखी वाचा-माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
भुजबळ यांना घटक पक्षातील नेतेही स्वीकारायला तयार नाहीत. असे असताना त्यांच्यासाठी पायघड्या का घातल्या जातात, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला. संविधानिक पदावर असताना भुजबळ यांनी जातीजातीत वाद लावण्याचे काम केले. भुजबळ हे न्यायालयात गेले नाहीत. त्यांनी रस्त्यावर उतरून इशाऱ्याची भाषा केली होती, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. सर्वेक्षणाच्या आधारे महायुती उमेदवारी निश्चित करीत असल्याचे सांगितले जाते. नाशिक मतदारसंघात सर्वेक्षण केल्यास केवळ मराठा समाज नव्हे तर, बारा बलुतेदारांचाही भुजबळ यांच्या नावाला विरोध उघड होईल, असा दावा यावेळी करण्यात आला. भुजबळ यांनी उमेदवारी केल्यास सकल मराठा समाजाकडून उमेदवार दिला जाईल, अशा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.