नवे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे सूचक वक्तव्य

महापालिकेच्या कारभारात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यावर भर दिला जाणार असल्याचे पहिल्याच पत्रकार परिषदेत नमूद करून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सत्ताधाऱ्यांसह पालिकेतील विरोधकांना दिलासा दिला. मुंढे यांचे जनहिताचे चांगले निर्णय कायम ठेवून काही निर्णयांमध्ये गरज भासल्यास बदल केले जातील, असेही गमे यांनी सूचित केले. कार्यभार स्वीकारल्यानंतर गमे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नंतर लागलीच विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली.

गुरुवारी सकाळी गमे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. महापौरांनी तुकाराम मुंढे यांचे चुकीचे निर्णय रद्द करण्याची घोषणा केली असल्याच्या पार्श्वभूमीवर गमे यांनी हे वक्तव्य केले. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर असल्याने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. हे आयुक्तपदाचा कार्यभार देण्याकरिता उपस्थित राहू शकले नाहीत.

मुंढे आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. आयुक्त लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत, समन्वय ठेवत नाहीत, असा भाजपचा आक्षेप होता. अखेपर्यंत हे वाद मिटले नाहीत. सत्ताधारी विरुद्ध प्रशासन संघर्षांचे स्वरूप प्राप्त झाले. त्या पार्श्वभूमीवर गमे यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.

नाशिकमध्ये आपण यापूर्वी काम केले असून येथील कामाचा चांगला अनुभव आहे. शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. मुंढेंच्या बदलीनंतर त्यांचे चुकीचे निर्णय रद्द करण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली होती. यासंबंधीच्या प्रश्नावर मुंढे यांनी जनहिताचे घेतलेले निर्णय कायम ठेवले जातील. काही निर्णयांमध्ये सुधारणेची गरज भासल्यास बदल केला जाईल. स्मार्ट सिटी अंतर्गत काही कामे प्रगतिपथावर असून काही कामे सुरू करावयाची आहेत. या कामांना प्राधान्य दिले जाईल. ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या सुरू राहतील असेही गमे म्हणाले.

भाजपच्या गोटात आनंद

पदाधिकारी-प्रशासनात समन्वय राखण्याची भूमिका गमे यांनी प्रारंभीच जाहीर केल्याने सत्ताधारी भाजपचा जीव भांडय़ात पडला आहे. इतकेच नव्हे, तर मुंढे यांच्या काही निर्णयात गरज वाटल्यास फेरबदल करण्याचे संकेत मिळाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मुंढे यांचे कोणते निर्णय योग्य आणि कोणते अयोग्य हे निश्चित करताना मात्र गमे यांची कसोटी लागणार आहे. नऊ महिने प्रशासनाने सापत्नभावाची वागणूक दिल्याची भाजप नगरसेवकांची भावना होती. मुंढे यांच्या बदलीनंतर त्याची परतफेड करण्यास सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली. नवनियुक्त आयुक्त समन्वय राखणार असल्याने प्रशासनाशी चाललेले वादविवाद मिटण्यास हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांकडून उमटत आहे.

Story img Loader