नाशिक – इगतपुरीतील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गाच्या मुख्य रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक आंदोलन होऊनही काम सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी अखिल भारतीय आदिवासी सेनेने जाहीर केलेल्या इगतपुरी शहर बंदला शहरातील व्यापारी, टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांनी प्रतिसाद दिल्याने शहरातील बहुतांश व्यवहार बंद होते.
या आंदोलनाची दखल घेऊन १४ एप्रिलपर्यंत मुख्य रस्त्याचे काम न झाल्यास १६ एप्रिलला मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर उघाडे यांनी दिला आहे. दिड वर्षापूर्वी महिंद्रा कंपनी ते गिरणारे हा चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी भूमिपूजन केले होते. मात्र केवळ ३०० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून उर्वरीत रस्त्याचे काम तसेच ठेवल्याने नागरिकांमधे तीव्र नाराजी पसरली. या मुख्य रस्त्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी उघाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते इगतपुरी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा – भुसावळला मोदी सरकारविरुद्ध युवक काँग्रेसचा रास्ता रोको
हेही वाचा – अट्रावलात दगडफेक; चार पोलिसांसह १० पेक्षा अधिक जण जखमी
पोलीस ठाण्यात मोर्चा आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन घोडके, सिमा जाधव, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या मोर्चात उघाडे, समता परिषदेचे यशवंत दळवी, ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी, रिपाइचे बाळासाहेब गांगुर्डे, रिक्षा संघटनेचे राजू मोरे आदी सहभागी झाले होते.