नागरिकांकडून सुटके चा नि:श्वास

इगतपुरी : तालुक्यात बिबट्यांचे हल्ले आणि शेत शिवारात त्यांचे दर्शन यामुळे नागरिक भयभीत झाले असताना वन विभागाकडून पिंजरे उभारून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न के ला जात आहे. पिंपळगाव मोर परिसरात लावलेल्या अशाच एका पिंजऱ्यात बिबट्याची मादी अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटके चा नि:श्वाास सोडला आहे. परंतु, परिसरात अजूनही बिबटे असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

पिंपळगाव मोर येथील कविता मधे (सहा) हिचा काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याची दखल घेत वन विभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात आले होते.

सात दिवसांपूर्वीच एका पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. या परिसरात चार पिंजरे आणि कॅमेरे लावले होते. गेल्या आठवड्यात २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक बिबट्या अडकला. ज्या ठिकाणी बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला होता. त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यातच बिबट्या अडकला. मागील आठवड्यात जेरबंद झालेल्या बिबट्यापेक्षा ही बिबट्याची मादी लहान असून साधारण चार ते साडे चार वर्षांची असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल एकनाथ भले, बी. जी. राव, वनरक्षक रेश्मा पाठक, मालती पाडवी, फैजअली सय्यद, संतोष बोडके, बी. एस. खाडे, गोविंद बेंडकोळी, दशरथ निरगुडे, मुजु शेख आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

इगतपुरी तालुक्यात बिबट्यांचा संचार वाढला असून पूर्व भागात नागरिकांवर बिबट्याने हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पिंपळगाव मोर आणि परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी धामणी येथे देखील सायंकाळच्या वेळेस बिबट्या दिसला होता. परिसरात अजूनही चार ते पाच बिबटे असून अजून काही दिवस पिंजरे कायम ठेवावेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण कायम आहे. गावातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी शेतीकडे जावे लागते.

काही जणांची शेती गावापासून दूर आणि डोंगरी भागात असल्याने अशा ठिकाणी जाणे एकट्या शेतकऱ्याला आता धोकादायक वाटू लागले आहे. अशावेळी कोणी सोबत असेल तरच शेतकरी शेतीवर जाऊ लागले आहेत. रात्री शेतात जाणे तर अधिकच धोकादायक झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता सर्व बिबटे पिंजऱ्यात अडकत नाहीत, तोपर्यंत पिंजरे कायम ठेवावेत, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

Story img Loader