लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : इगतपुरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी येथील आदिवासी विकास आयुक्तालय गाठले. आदिवासी आयुक्त डॉ. नयना गुंडे यांनी दोन ते तीन दिवसात समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

इगतपुरी येथील आदिवासी वसतिगृहात ३० हून अधिक विद्यार्थी आहेत. या ठिकाणी मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी गृहपाल तसेच कनिष्ठ लिपीक, शिपाई आहेत. या ठिकाणी मिळणारे जेवण निकृष्ठ दर्जाचे आहे. याबाबत तक्रार करूनही कुठल्याच प्रकारचे बदल झालेले नाहीत. गृहपाल व अन्य कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकारी वसतिगृह भेटीसाठी येत असतांना विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या आणण्यास सांगितले जाते. विद्यार्थ्यांनी नकार दिल्यास त्यांना धमकी दिली जाते. गृहपाल शिवीगाळ करतात. शिपाईही शिवीगाळ करत वसतिगृहाची स्वच्छता करून घेतात.

आणखी वाचा-नाशिक : अंबड पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकासह मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण

तक्रारींची दखल न घेतल्यास आदिवासी दिनापासून आदिवासी आयुक्त कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयात ठिय्या देत मागण्यांचे निवेदन आयुक्त डॉ. नयना गुंडे यांना दिले. याबाबत दोन ते तीन दिवसात आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन गुंडे यांनी दिले.

Story img Loader