जळगाव – जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मध्य प्रदेश सीमेजवळ उमर्टीसारख्या लहान खेड्यात अगदी घराघरातून गावठी बंदुकांची निर्मिती केली जाते. याठिकाणाहून महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात बंदुकांची सर्रास तस्करी होत आहे. पोलिसांना ही तस्करी आजपर्यंत रोखण्यात आलेली नाही. कोणालाही न जुमानणाऱ्या संबंधित गुन्हेगारांनी शनिवारी थेट पोलीस पथकावर हल्ला चढवण्यासह एकाला ओलीस ठेवण्याची हिंमत केल्याने उमर्टी पुन्हा चर्चेत आले आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलात अनेर नदीच्या काठावर उमर्टी नावाची दोन गावे वसली आहेत. त्यापैकी एक उमर्टी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तर दुसरे उमर्टी (पार) मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात आहे. दुर्गम भागातील दोन्ही गावांपैकी मध्य प्रदेशातील उमर्टीत अवैध हत्यार निर्मिती होत असते. त्याठिकाणी तयार होणाऱ्या बंदुकांच्या तस्करीला महाराष्ट्रातील उमर्टी हातभार लावत असते. उमर्टीत तयार होणाऱ्या बंदुका चोरट्या मार्गाने राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवण्याचा प्रकार वर्षानुवर्षांपासून सुरू असताना, पोलिसांना तो पूर्णपणे कधीच थांबवता आलेला नाही. पोलिसांच्या कारवाईत सातत्य राहत नसल्याने बंदुकांची तस्करी करणारे क्वचितच पकडले जातात. तस्कर पकडले गेले तरी उमर्टीत बसून बंदुका तयार करणारे मोकाट फिरतात.
पाच हजारात गावठी बंदूक
उमर्टीत तयार होणाऱ्या गावठी बंदुकीची किंमत पाच ते १० हजारापर्यंत असते. तयार झालेली हत्यारे सर्वात आधी चोपडा, अमळनेर किंवा मध्य प्रदेशातील सेंधवा या तालुक्यांच्या ठिकाणी पोहोचवली जातात. तेथून पुढे राज्यासह देशातील मोठ्या शहरांमध्ये ती पाठवली जातात. नाकाबंदीत कोणी बंदूक तस्कर पकडला गेलाच तर पोलीस पुढील तपासासाठी उमर्टीत दाखल होतात. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागत नाही. कारण, गावात प्रवेश केल्यानंतर कोणत्याच घरात बंदुकांचा कारखाना आढळून येत नाही. एखाद्या निर्जनस्थळी जंगलात कोणाला माहीत नसलेल्या ठिकाणी बंदुका तयार करण्याचे काम चालते. त्या ठिकाणांपर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत. लोहारकामात कुशल असणारी सिकलगर जमात गावठी बंदुकांच्या निर्मितीत प्रामुख्याने गुंतलेली आहे. राज्यासह देशातील गुन्हेगारीला खतपाणी घालण्यास कारणीभूत ठरलेल्या उमर्टीतील बंदुकांच्या कारखान्यांना पूर्णपणे उदध्वस्त करण्यात मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा आतापर्यंत सपशेल अपयशी ठरली आहे.
पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षी ६८ कारवाया करून उमर्टीतून तस्करी होणाऱ्या १०० गावठी बंदुका जप्त केल्या होत्या. यंदाही १२ बंदुका पकडल्या असून, सदरचे कारखाने मध्य प्रदेशच्या हद्दीत असल्याने तेथील पोलिसांशी समन्वय ठेवून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.
– डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव)