नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने सुमारे साडेपाच कोटींचा अवैध मद्यसाठा, अमली पदार्थ आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. यात दोन कोटी ४५ लाखाची दारु तर २४ लाख ५४ हजार रुपयांच्या अमली पदार्थांचा समावेश आहे.

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. या काळात मद्याचा महापूर वाहत असल्याचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर, मद्याची अवैध वाहतूक व अमली पदार्थ विक्रीवर यंत्रणांकडून काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून आतापर्यंत विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने अहवालातून दिली आहे. त्यानुसार या काळात एक कोटी ७१ हजार ६६३ लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे अडीच कोटीच्या घरात आहे.

हेही वाचा…रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ

इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा पकडण्यात आला. नाशिक पश्चिम व नाशिक मध्य विधानसभा क्षेत्रात हे प्रमाण सर्वात कमी आहे. त्याचवेळी एक लाख १७ हजार ग्रॅम विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत २५ लाखाच्या आसपास आहे. याच काळात दोन कोटी ७१ लाख रुपये किंमतीची अन्य सामग्री जप्त करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यापासून पाच कोटी ४१ लाख रुपयांचा अवैध मद्य व अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

Story img Loader