धुळे – महानगरपालिकेतर्फे मालमत्तेचे लेसरगनद्वारे केलेले बेकायदेशीर मोजमाप आणि त्यातून वसूल करण्यात येणारा मालमत्ता कर तात्काळ थांबवावा, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहराचा विस्तार वाढला असून आजूबाजूची काही गावेही महानगरपालिकेच्या हद्दीत सामील करण्यात आली आहेत. त्यादृष्टीने जुन्या आणि नवीन मालमत्तेचे मोजमाप करून फेरमुल्यांकन करण्याचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे.
मोजमाप झाल्यावर फेरमुल्यांकन करण्यात येत असले तरी ते मालमत्ता धारकांना परवडणारे नाही. प्रत्यक्षात महापालिकेकडून आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या परिपूर्ण सुविधा दिल्या जात नाहीत, तोडक्या वैद्यकीय सुविधा, तोडके पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण, नादुरुस्त रस्ते, शहरात घाणीचे साम्राज्य, अनियमित पाणी पुरवठा, अनेक वसाहतींमध्ये अद्यापही रस्ते, वीज, पाणीपुरवठा, कचरा संकलन आणि गटारींचा अभाव आहे. मनपाने एका खासगी कंपनीला मालमत्तेच्या फेरमुल्यांकनाचे काम दिले असून महिन्यापासून शहरातील एकूण सर्वच मालमत्तेचे फेरमुल्यांकन करण्यासाठी मालमत्तेचे लेसर गनद्वारे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लेसर गनचा वापर हा वैध मापनशास्र, अधिनियमातंर्गत गुन्हा आहे. यामुळे लेसर गनद्वारे होत असलेले मालमत्तेचे मोजमाप थांबवून सदर ठेकेदारावर कायदेशीर कारवाईचे निर्देश द्यावेत, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देऊन महापालिकेतर्फे होणारी संभाव्य लूट वेळीच थांबवावी, नव्याने मोजमाप केल्यानंतरच मालमत्ता कर वसूल करण्याचे आदेश व्हावेत. अशी मागणी ग्राहक परिषद, ग्राहक पंचायत सदस्य, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि धुळेकर जागृत नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.
हेही वाचा – धुळे : आस्था संस्थेसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा; महापौरांची आयुक्तांना सूचना
निवेदनावर डॉ. योगेश सूर्यवंशी, दिनेश रेलन, प्रा. सुनील पालखे. डॉ. अरुणकुमार छाजेड आदींची स्वाक्षरी आहे.