अवैधपणे वाहतूक होणारा औषधसाठा जप्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : गर्भपातासाठी वापरला जाणारा विनापरवाना, खरेदी देयक नसलेला एक लाख रुपये किमतीचा औषध साठा मालेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत जप्त केला. शहरात गर्भपातासाठीच्या औषधांची अनधिकृतपणे विक्री होत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. कारवाईत एका संशयिताला पकडण्यात आले असून दुसरा फरार झाला. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली.

या विभागाचे औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल के ली. गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे, संचाची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मालेगाव शहरात शहरात विक्री केली जाते.

संशयित शेख वसीम अब्दुल खालीक त्या औषधांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर आझादनगर पोलीस हद्दीतील ब्लू बर्ड साईजिंगलगतच्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी दोन्ही विभागांचे संयुक्त पथक धडकले. काही वेळ थांबल्यानंतर तिथे रिक्षा येताना दिसली. ही रिक्षा थांबविण्यासाठी पथक पुढे सरसावल्यानंतर रिक्षाच्या पाठीमागे मोटारसायकलवर असलेला वसीम पथकाची चाहूल लागल्यावर पळू लागला.

पोलिसांनी त्याला ओळखले. या वेळी संशयिताने प्लास्टिकची गोणी रिक्षात सोडून गर्दीतून पळ काढला. पोलिसांनी रिक्षाचालक आबिद मोहंमद आमीनला ताब्यात घेतले. संबंधिताने गर्भपाताचे संच, औषधे ही फरार झालेल्या शेख वसीमची असल्याची कबुली दिली. या प्रकरणी औषध निरीक्षक ब्राह्मणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून औषधे,  सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत ९० हजार रुपये किमतीचे १५० संच आणि रिक्षा असा एक लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.