नंदुरबार – महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात इंडन टिंबर डेपोवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७७ लाख १८ हजार ४३६ रुपयांचे खैराचे ४८० घनमीटर लाकूड जप्त केले. तीन ते चार दिवस गुप्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.
धुळे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक नीनू सोमराज यांना अक्कलकुवा येथे इंडेन टिंबर डेपो या खासगी वखारीत खैराची अवैधपणे साठवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यांनी या प्रकरणाची खात्री करण्यासाठी दक्षता विभागाच्या धुळे विभागीय वन अधिकाऱ्यास पाठविले होते. २५ जुलै रोजी अधिकाऱ्यांनी इंडेन टिंबर डेपोला भेट दिली असता मोठ्या प्रमाणात खैराचा साठा दिसला. खैर साठ्याची चौकशी करण्यासाठी तळोदा येथील सहायक वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली २६ जुलै रोजी समिती स्थापन करण्यात आली. या समितीस चौकशीसाठी अधिकचा कालावधी आवश्यक असल्याने आणि वखार मालकाच्या मागणीनुसार चौकशी लवकर संपविण्याच्या दृष्टीने दक्षता विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सप्टेंबर २०२४ रोजी अन्य एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालानुसार वखार मालकाकडे खैर साठा करण्याचा परवाना असला, तरी प्रत्यक्ष जागेवर ६०८ घनमीटर खैर साठा आढळून आला. त्यापैकी ४७६.८१ घनमीटर खैर अवैध आढळून आले.
हेही वाचा >>>गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव
या प्रकरणात प्रथम दर्शनी दोषी आढळून आलेल्या अमलबारी येथील वनपालास निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यासाठी मेवासी (ता. तळोदा) येथील उपवनसंरक्षक यांना नेमण्यात आले आहे. मेवासी येथील उपवनसंरक्षकांनी वखार मालका विरुध्द वनपरिक्षेत्र अक्कलकुवा (परिमंडळ अमलीबारी) येथे गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ४८० घनमीटर खैर साठा अवैध आढळून आला असून त्याची किंमत सुमारे ७७ लाख १८ हजार ४३६ रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे. खैर साठा जप्त करण्यात आला आहे.