लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : जळगावसह यावल येथील तहसीलदारांच्या संयुक्तिक पथकाची एकाच दिवशी, एकाच वेळी शेळगाव बॅरेजजवळ अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणार्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. पथकाला पाहून वाळूमाफिया अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळावरून जेसीबीसह वाळूने भरलेले तीन डंपर यावलच्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई मध्यरात्री केल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाईच्या सूचना महसूल विभागाला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महसूल, पोलीस प्रशासनाकडून कारवाईची मोहीम राबविली जात असून, थेट नदीपात्रात महसूल व पोलीस प्रशासनाची पथके उतरत आहेत. जळगाव व यावल तालुक्याच्या हद्दीवर तापी नदीवरील शेळगाव बॅरेज परिसरातून तापी नदीपात्रातून विनापरवाना अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. त्यात यावल तालुक्यातील बोरावल, भालशिव, टाकरखेडामार्गे आणि जळगाव तालुक्यातील शेळगाव, भादली, आसोदा परिसरातून नदीतील गाळ वाहतुकीच्या नावाखाली वाळू व पिवळी मातीची चोरट्या मार्गाने सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली.
आणखी वाचा-रावेर लोकसभेसाठी आपला पहिला क्रमांक; एकनाथ खडसे यांचा उमेदवारीसाठी दावा
जिल्ह्यात मध्यरात्री जळगावचे तहसीलदार डॉ. राहुल वाघ व यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी संयुक्तपणे पोलीस व महसूल पथकाच्या सहाय्याने छापे टाकून घटनास्थळावरून जेसीबीसह वाळूने भरलेले तीन डंपर ताब्यात घेतले. पथकाला पाहताच वाळूमाफिया अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र, पथकाने जीसीबी व तीन डंपर ताब्यात घेत ते यावलच्या तहसील कार्यालयात जमा केले. आता पोलीस बंदोबस्तात अवैध गौण खनिज कारवाईत सातत्य राहणार असल्याचे महसूल व पोलीस विभागातील सूत्रांनी सांगितले.
जळगावसह यावल तालुका महसूल विभागाकडून आपापल्या कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणार्यांची इत्थंभूत माहिती पूर्ण नाव, गाव, पत्त्यासह वाहन क्रमांक, तसेच त्याचे कोणते कोणते उद्योगधंदे आणि कोणाच्या प्रभावाखाली कोणाशी संबंधित राहून बेकायदा व्यवसाय करीत आहेत आणि त्या वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अधिकृतरीत्या केली आहे किंवा नाही? किंवा ती वाहने कुठून आणलेली आहेत? याबाबतची माहिती संकलित करून आगामी काळात पोलीस बंदोबस्तात कडक कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.