एकीकडे पोलिसांकडून विविध माध्यमांतून नागरिकांशी संवाद साधत रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी पोलिसांचा धाकच उरला नसल्याने चोरटय़ांचे फावले असून पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मंदिरांमधील चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.
शहर परिसरात सोनसाखळी चोरी, चोऱ्या, लूटमार, या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पोलिसांचा कोणताही वचक नसल्याने भरदिवसा नंग्या तलवारींसह गुंडांनी धुमाकूळ घालण्याची घटनाही अलीकडेच घडली होती. पोलीस महासंचालकांचा दौरा नेमका त्याच दरम्यान असल्याने कधी नव्हे ती आक्रमकता दाखवीत पंचवटी पोलिसांनी गुंडांचा पाठलाग करून त्यांना भररस्त्यात चोप देण्याचे धाडस दाखविले होते. परंतु महासंचालक शहरातून परत जाताच अटक करण्यात आलेल्या गुंडांची जामिनावर सुटका झाल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांची गस्त नसणे किंवा पोलिसांची कोणतीही भीती नसल्याने भीड चेपलेल्या चोरटय़ांनी आता चक्क मंदिरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गजबजलेल्या रामकुंड परिसरातील गंगा गोदावरी मंदिरातून दागिन्यांची चोरी, आडगाव येथील महालक्ष्मी मंदिरातून १३ किलोची पितळी मूर्तीची चोरी, हा त्याचाच भाग आहे.
अवघ्या चोवीस तासांच्या आत या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: आडगावचे ग्रामस्थ याविरोधात एकवटले असून पोलिसांनी त्वरित चोरटय़ांचा तपास लावण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे, पोलिसांकडून नागरिकांना दक्ष राहण्याचा तसेच मंदिराच्या व्यवस्थापनास सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader