मजदूर संघाच्या आंदोलनाने कामकाजावर परिणाम; तीन कामगार निलंबित

सदोष नोटा छपाई केल्याप्रकरणी नाशिकरोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयातील तीन कामगारांना निलंबित करण्याच्या निर्णयाचे उमटलेले पडसाद बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. निलंबित कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी मजदूर संघाचे आंदोलन सुरू केले. आंदोलनाचा मुद्रणालयातील दैनंदिन कामकाजावर विपरित परिणाम झाला. मुद्रणालय व्यवस्थापनाने कामगारांची मागणी फेटाळून लावल्याने पेच कायम आहे. सदोष नोटा छपाई झाल्याचे निदर्शनास आल्यावर शिल्लक राहिलेला नोटांचा कागद जाळून नष्ट करण्यात आल्याचे सांगितले जाते.मात्र, त्यास दुजोरा मिळू शकला नाही.

होशंगाबादच्या कागद कारखान्यातून एक हजार रुपयांच्या नोटेसाठी आलेल्या कागदात सुरक्षा तार नसताना चलार्थपत्र मुद्रणालयात ३० कोटी रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आली. या नोटा नंतर रिझव्‍‌र्ह बँकेकडे जाऊन पुढे त्या देशभरातील बँकांमध्ये वितरित झाल्या. काही जागरूक नागरिकांनी हजारांच्या नोटेत सुरक्षा तार नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर रिझव्‍‌र्ह बँकेने सदोष छपाई झालेल्या नोटांचे वितरण थांबविले आणि या घटनेची चौकशी सुरू केली. या प्रकरणात आधी होशंगाबाद कागद कारखान्याच्या व्यवस्थापकांची बदली झाली, तर व्यवस्थापक दर्जाचे दोन अधिकारी निलंबित झाले. त्याच धर्तीवर नाशिकरोडच्या चलार्थ मुद्रणालयात चौकशी होऊन काहींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुद्रणालयातील नियंत्रण विभागातील तीन कामगारांना निलंबित करण्यात आले. सहा अधिकाऱ्यांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. कामगारांच्या निलंबनाचे पडसाद मंगळवारी चलार्थपत्र मुद्रणालयात उमटले. कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या मजदूर संघाने सकाळी मुद्रणालयासमोर धरणे आंदोलन केले.

दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते. निलंबित कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे अशी मागणी त्यांनी महाव्यवस्थापक एस. के. जैन यांच्याकडे केली होती. वरिष्ठ पातळीवरून ही कारवाई झाली असून तो निर्णय मागे घेता येणार नसल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. सदोष नोटा छपाई प्रकरणात व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील वाद वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे.

शिल्लक कागदाचे काय ?

या घडामोडी सुरू असताना शिल्लक राहिलेला उपरोक्त कागद जाळून नष्ट केला गेल्याचे सांगितले जाते. मात्र, या मुद्यावर कामगार संघटना अथवा व्यवस्थापन काहीही बोलण्यास तयार नाही.

Story img Loader