मनमाड – पेरणीसाठी शेतकर्यांचा विश्वास असलेले मृग नक्षत्र अखेर कोरडेच गेले. गुरुवारपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. मृग नक्षत्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यासह येणारा पाऊस यंदा बरसलाच नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. पावसाचा अंदाज बांधून शेतकरी खते, बी-बियाण्यांच्या खरेदीला सुरूवात करतो. बाजारपेठेत चैतन्य निर्माण होते. यंदा मात्र पावसाअभावी बाजारपेठेत मंदीचे सावट उभे ठाकले आहे.
मृगात पेरणी केली तर पीक लवकर हाती येते. पाऊसही चांगला मिळतो. यंदा रोहिणी नक्षत्रात दोन ते तीन वेळेस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र नंतर आठ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र संपले तरी पावसाची काही चिन्हे दिसत नसल्याने ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, भुईमूग आदींच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी खरिपाचे तयारी झाल्याने पावसाची वाट बघत आहे पाऊस नसल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम पाहायला मिळत आहे. कीटकनाशके, बी -बियाणे खते आदींच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी दिसत नाही. एरवी जूनच्या पावसाबरोबर बाजारपेठेत उत्साह संचारतो. ग्रामीण भागात खते, बी-बियाणे खरेदीसाठी रांगा लागतात. इतर व्यवसायांना चालना मिळते. पाऊसच नसल्याने विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट दिसून येते.
हेही वाचा >>>धुळे: मंडळ अधिकारी लाच स्विकारताना जाळ्यात
वातावरणात उष्मा असल्याने शेतीच्या कामांवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. दमदार पावसाचे लवकर आगमन न झाल्यास खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन बिघडणार असल्याची स्थिती आहे. बळीराजा पेरणीपूर्व मशागतीचे नांगरणी, वखरणी आटोपून आकाशाकडे नजर लावून बसला आहे. चारा टंचाई असल्याने जनावरांचेही या काळात हाल होणार आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ७५ मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पावसाअभावी शेत शिवारातील चैतन्य हरवले आहे. बळीराजा चातक पक्षासारखी पावसाची वाट बघत आहे. आजपासून आर्दा नक्षत्र सुरू झाले. या नक्षत्रात तरी सुरुवातीपासून चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा >>>दंगली, नक्षली कारवायांमागे विदेशी शक्ती; कैलाश विजयवर्गीय यांचा दावा
हुलकावणी
मनमाडसह जिल्ह्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा आहे. सकाळपासून उन्हामुळे नागरिक हैराण झाले. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. पावसाळी वातावरण पाहून सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या. पण गेल्या दोन दिवसापासून पाऊस हुलकावणी देत आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ पावसाळी वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी आल्या. मृग नक्षत्रात भरपूर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज फोल ठरला.
हेही वाचा >>>गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
शेतकरी चिंताक्रांत
जून महिन्याचे अवघे सात-आठ दिवस बाकी असताना अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कुठेही पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकरी चिंतातुर झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील आठ ते दहा वर्षापासून शेती व्यवसायात तोटा सहन करावा लागला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी पीक चांगले आले. भरपूर उत्पादन मिळणार अशी अपेक्षा असतांना पीक काढणीच्या वेळी अतिवृष्टीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. खरिपाची प्रेरणी वेळेवर होऊन भरपूर उत्पन्न मिळेल, यासाठी शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करतो पण यंदा मात्र पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.