सीएम चषक स्पर्धेत सरकारी योजनांच्या प्रसिद्धीची शक्कल

केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याच्या प्रसिद्धीसाठी भाजपने अनोखी शक्कल लढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आठ ते १८ डिसेंबर या कालावधीत आयोजित  क्रीडा आणि कला महोत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेला ‘उडाण’, ‘कुस्ती’ला  ‘स्वच्छ भारत’ तर कबड्डी स्पर्धेला ‘शेतकरी सन्मान’ अशी नावे देऊन योजनांच्या प्रसिद्धीचा मेळ साधण्यात आला आहे. भाजप आणि मानदंड संस्था यांच्यावतीने  सीएम चषक क्रीडा आणि कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून  देशातील सर्वात मोठा हा महोत्सव असेल असा दावा भाजपने केला आहे.

क्रीडा प्रकार आणि संबंधित योजना यांच्यातील विरोधाभास अधिक ठळकपणे उघड होत असला तरी या माध्यमातून सरकारी योजनांची प्रसिद्धी करण्याचे धोरण भाजपने ठेवले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके तर सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असणारे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे नगरसेविका स्वाती भामरे यांनी सांगितले.

या संदर्भात विचारणा केली असता पक्षाच्या कार्यालयाकडून त्याप्रमाणे नावे दिली गेल्याचे सांगण्यात आले. सरकारी योजनांची क्रीडा, कला प्रकारांशी सांगड घालताना कोणताही निकष लावला गेला नाही. यामुळे धावण्याच्या शर्यतीला देशातील शहरांना विमान सेवेने जोडणाऱ्या उडाण, बेरोजगारांना वित्त पुरवठा करणाऱ्या मुद्रा योजनेशी संलग्न केले गेले. इतकेच नव्हे तर, नृत्य स्पर्धेला दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस जोडणी देणारी उज्ज्वला योजना तर कुस्तीला शेतकरी सन्मान योजना, कॅरमला कौशल भारत असे नामकरण केल्याचे दिसून येते.

योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या स्पर्धा

क्रिकेट (आयुष्मान भारत), खो-खो (सौभाग्य), कुस्ती (स्वच्छ भारत), १०० मीटर धावणे (उडान), व्हॉलीबॉल (जलयुक्त शिवार), कबड्डी (शेतकरी सन्मान), कॅरम (कौशल भारत), ४०० मीटर धावणे (मुद्रा योजना) या स्पर्धा विविध ठिकाणी होतील. कला स्पर्धेत चित्रकला (इंद्रधनुष्य), गायन (उजाला), नृत्य (उज्ज्वला), रांगोळी (मेक इन इंडिया) या स्पर्धा नऊ ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. रांगोळी स्पर्धा १४ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय होणार असल्याचे भामरे यांनी म्हटले आहे.

Story img Loader