किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा परिणाम

कांद्याचे किमान निर्यात मूल्य हटविण्याच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम जिल्ह्य़ात दिसत असून, चार दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी उघडलेल्या बाजार समित्यांमध्ये आवकेत वाढ होऊनही सरासरी भावात प्रति क्विंटलला २०० ते ३५० रुपयांनी वाढ झाली. लासलगाव बाजारात पाच दिवसांपूर्वी प्रति क्विंटलला ११५० वर असणारा भाव या दिवशी १४०० रुपयांपर्यंत गेल्यामुळे उत्पादकांमध्ये काहीसे समाधान आहे. पुढील काळात मागणी व पुरवठा या समीकरणावर भाव अवलंबून राहील. निर्यात शून्यावर आणण्याचा निर्णय वेळेवर घेतला गेला असता तर महिनाभरात राज्यातील शेतकऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान टाळता आले असते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

खरीप व रब्बी हंगामाच्या दरम्यान बाजारात येणाऱ्या लाल (रांगडा) कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे महिनाभर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. रांगडा हा साठवणूकक्षम कांदा नाही. त्याचे आयुर्मान साधारणत: एक ते दीड महिने असल्यामुळे तो निर्यात करता येतो. मागील काही वर्षांच्या एकूण निर्यातीचा आढावा घेतल्यास त्याचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे लक्षात येते. या वर्षी अधिकच्या किमान निर्यात मूल्यामुळे तो निर्यात करणे अवघड बनले होते. परिणामी, त्याचे भाव ८०० ते ९०० रुपयांपर्यंत गडगडले. त्यामुळे संतप्त पडसाद उमटू लागल्यानंतर मध्यंतरी केंद्र सरकारने ७०० डॉलरवर असणारे किमान निर्यात मूल्य ४०० डॉलरवर आणले होते, परंतु कांदा भावात काही विशेष सुधारणा झाली नाही. उपरोक्त भावात उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष कायम होता. दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी किमान निर्यात मूल्य शून्यावर आणण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. अखेरीस निर्यातीला मुख्य अडथळा ठरलेले किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय गेल्या बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्याची माहिती येईपर्यंत त्या दिवसाचे लिलाव पूर्णत्वास गेले होते. त्यानंतर सार्वजनिक व साप्ताहिक सुटी आल्याने चार दिवस सर्वच बाजार समित्यांचे कामकाज बंद होते. या निर्णयाचे परिणाम सोमवारी जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये पाहावयास मिळाले.

चार दिवसांच्या सुटीमुळे कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह सर्वच बाजार समित्यांमध्ये विक्रमी आवक झाली. लासलगाव बाजारात सकाळच्या सत्रात ११५० ट्रॅक्टर, जीप वाहनांची नोंद झाली होती. या वेळी किमान १००० ते कमाल १६२३ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. सरासरी भाव १४०० रुपये होता. बाजार बंद होण्याच्या दिवशी हाच भाव ११५० रुपये होता. कांदा निर्यातीचा मार्ग सुकर झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. जिल्ह्य़ातील इतर बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. मनमाड बाजार समितीत ५०० ट्रॅक्टरची आवक झाली. त्यास सरासरी १२५० रुपये भाव मिळाला. या ठिकाणी बाजार बंद झाला तेव्हा सरासरी भाव ११०० रुपये होता. बहुतांश ठिकाणी विक्रमी आवक होऊनही भावात १५० ते ३०० रुपयांनी वाढ झाली. पुढील काळात मागणी व पुरवठा याचे समीकरण कसे राहील, यावर भाव अवलंबून राहणार असल्याचे सांगितले जाते. चार दिवसांच्या सुटीमुळे या दिवशी मोठी आवक झाली. पुढील दोन ते तीन दिवस हे प्रमाण काहीसे तसेच राहू शकते.

या स्थितीत पहिल्या दिवशी भावात काहीअंशी वधारणा झाली. निर्यात सुरू झाल्यास पुढील काळात समाधानकारक भाव मिळू शकेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.

निर्णयास विलंबामुळे कोटय़वधींचे नुकसान

निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय मागील महिन्यात घेणे आवश्यक होते. वेळेवर हा निर्णय न घेतल्यामुळे भावातील घसरणीत शेतकऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. आधीच हा निर्णय झाला असता तर हे नुकसान टाळणे शक्य होते. मध्यंतरी किमान निर्यात मूल्य कमी केले गेले. तेव्हा कांदा भाव क्विंटलला १००० ते ११०० रुपयांवर स्थिरावले होते, मात्र त्या वेळी भावात सुधारणा झाली नाही. निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर भावात काहीशी वधारणा झाली. या निर्णयाचा प्रभाव भावावर दिसत आहे, मात्र पुढील काही दिवसांनंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. – नानासाहेब पाटील, (सभापती, लासलगाव बाजार समिती)

 

Story img Loader