लोकसत्ता वार्ताहर
धुळे: शहरातील संघमा चौकातील एका चिकन दुकानात एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकावर मटण कापण्याच्या सुऱ्याने वार करण्यात आला. याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात आशिश झाल्टे (रा. देवचंद नगर, संघमा चौक, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी झाल्टे हे संघमा चौकातील तनवीर चिकन या दुकानात खरेदीसाठी गेले होते. यावेळी तेथे बबलु खरात ही व्यक्ती आली. त्याने ५०-१०० रूपयाचे चिकन घेणार्या छिछोर्या लाकांना दुकानाच्या बाहेर काढ, मी दोन ते तीन किलो चिकन घेणार आहे, अशी दमदाटी दुकानदार आणि झाल्टे यांना केली.
हेही वाचा… सचिवांकडून अजितदादांना चुकीचे मार्गदर्शन; आपली आकडेवारी अधिकृत; छगन भुजबळ यांचा दावा
वाद विकोपाला जाऊन बबलुने चिकन कापण्याचा सुरा उचलून झाल्टे यांच्यावर वार केला. यात झाल्टे यांच्या डाव्या बाजूच्या गालावर दुखापत झाली. ते बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांनी भावाला काय घडले, ते सांगितले. भावाने दुकानात येवून झाल्टे यांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलविले. या घटनेनंतर झाल्टे यांनी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी खरातविरूद्ध पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी खरातविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.