खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यातर्फे बैठकीचे आयोजन
सुरगाणा तालुक्यातील दुष्काळावर सखोल चर्चा करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तालुक्यातील सर्वच विभागांच्या अधिकारी वर्गाची आढावा बैठक बोलावली. बैठकीत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. तालुक्यातील विकासकामांचा सुमार दर्जा पाहता खासदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आदिवासी सेवक मोतीराम गावित, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर आदी उपस्थित होते. मात्र या बैठकीकडे तहसीलदारांसह, वन विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदीसह अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आढावा बैठकीत चर्चा करून तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार ही अपेक्षाच फोल ठरली.
त्यामुळे तहसील कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी उपस्थित असलेल्या अधिकारी वर्गावर राग व्यक्त करीत संतापाला वाट मोकळी करून दिली. तालुक्यातील विकासकामांची स्थिती पाहता अधिकाऱ्यांना ‘तालुक्यात चांगली कामे करून दाखवा. पोटाची आग भडकली की माणसांची माथी भडकतात’ असा इशारा दिला.
खासदार चव्हाण म्हणाले, दुष्काळाची चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. मात्र अधिकारीच गैरहजर आहेत. पाऊस कमी कालावधीत पडला त्यामुळे भात, नागली, वरई आदी पिके घेता आली नाहीत. इतर दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना शासनाने नेमके कोणते निकष लावले हे कळायला मार्ग नाही.
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कामाच्या शोधात दिंडोरी, निफाड, पिंपळगाव या ठिकाणी नागरिक स्थलांतरित झाले असून त्यांना तालुक्यातच काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे.
बैठकीत मनखेड, पोहाळी, गारमाळ, दुर्गापूर, खुंटविहीर अपूर्ण व रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तालुक्यात पाणीपुरवठा विभागाचे काम चांगले नाही अशी टिप्पणी खा. चव्हाण यांनी केली तसेच काठीपाडा, पळसन येथील ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. वीज वितरण विभागाने गंजलेले विजेचे पोल बदलावेत, सुरगाणा शहरातील बस स्थानकाजवळील पिण्याच्या पाण्याची विहीरच चोरीला गेली आहे, तिचा तपास करावा, शहरातील अवैध धंदे बंद करावेत, बस स्थानकातील अतिक्रमण हटवावे, आदी मागण्या माजी नगराध्यक्ष रंजना लहरे यांनी केल्या. तालुक्यातील वैद्यकीय सेवा अतिशय बिकट झाली आहे. यात सुधारणा करण्यात यावी. तसेच अंबाठा ते पिंपळसोंड या गुजरात सीमेलगतच्या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. तालुक्यात सीमेलगतच्या रस्त्यांची दुरवस्था झाली याकडे लक्ष देण्यात यावे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.