भुसावळ : तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या मुक्ताई सागर (हतनूर) धरणाच्या म्हणजेच तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे १८ दरवाजे शनिवारी सकाळी दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाचे अभियंता शशिकांत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे शनिवारी मुक्ताई सागर धरणाच्या पातळीत वाढ झाली. सकाळी नऊ वाजता धरणाचे १८ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून ७५८९२ क्युसेस एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
हेही वाचा : मालमोटारीखाली दबून सोनगीर रुग्णालयातील महिला डॉक्टरचा मृत्यू
धरणात एकूण पाणी साठा ३४५ दशलक्ष घनमीटर (८९.०५ टक्के) तर पाणी पातळी २१३.२७० मीटर इतकी आहे, अशी माहिती अभियंता चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात महिनाभरानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून पुन्हा पाऊस सुरु झाल्याने खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. चाळीसगाव परिसरात दोन महिन्यांनंतर पावसाचे आगमन झाले. पाऊस काही दिवस कायम राहिल्यास जनावरांच्या चारापाण्याच्या समस्येची तीव्रता कमी होऊन रब्बीसाठी फायदेशीर ठरणार आहे