धुळे: भुसावळ येथील दुहेरी हत्या प्रकरणातील सहा संशयितांना धुळे पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून इनोव्हा कार, १० मोबाईल आणि ५४ हजाराची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. धुळे-सुरत महामार्गावरील दहिवेल (ता. साक्री) शिवारात एका हॉटेलात जेवण करून निघताना ते साक्री पोलिसांच्या हाती लागले.
भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर बुधवारी रात्री जळगावहून भुसावळकडे मोटारीने जात असताना भुसावळमधील जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोरील पुलाजवळ गोळीबार करण्यात आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले होते. या दुहेरी हत्या प्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : नाशिक : जिल्ह्यात बालकासह दोन जणांचा बुडून मृत्यू
हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांना मिळालेल्या माहितीवरून साक्री पोलिसांचे पथक दहिवेल (ता.साक्री) शिवारातील हॉटेल शिवम येथे पोहोचले असता इनोव्हा कार उभी दिसली. कारमधील माणसे जेवणासाठी थांबले असल्याची खात्री केल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि हे सर्वजण वाहनातून गुजरातच्या दिशेने निघत असतांना त्यांना पकडण्यात आले. पैकी दोघांनी पोलिसांची नजर चुकवून पळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले.
हेही वाचा : नाशिक : बनावट नोटांसह दोन महिला ताब्यात
राजु सूर्यवंशी (५५), रोहन सूर्यवंशी (२३), आनंद सूर्यवंशी (४०) तिघे रा. संभाजी नगर, वरणगाव रोड, भुसावळ, इम्रान शेख (३५, रा. जलाल शहा बाबा दर्गा समोर सरस्वती नगर, भुसावळ), विकास लोहार (३१, साकेगाव, भुसावळ) आणि धरमसिंग पंडित (२९, रा. बालाजी मंदिराजवळ, राहुल नगर, भुसावळ) अशी संशयितांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह सहायक निरीक्षक किरण पाटील, राजु जाधव, रामलाल अहिरे, दीपक विसपुते, विक्रांत देसले, पोलीस अंमलदार दिनेश मावची, प्रमोद जाधव, पोलीस अंमलदार संतोष मोरे यांनी ही कामगिरी केली.