जळगाव : दुहेरी हत्याकांडाने पुन्हा भुसावळ हादरले असून, रात्री भाजपच्या माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्त्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात दोघे गंभीर जखमी झाल्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. भुसावळ शहरात अनेक दिवसांपासून गुन्हेगारी विश्वात शांतता राहिल्यानंतर बुधवारी रात्री गोळीबाराने शहर हादरले. शहरातील जुना सातारा भागातील मरिमाता मंदिर परिसरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर अनोळखी हल्लेखोरांनी गोळीबार केला. दोघेही जळगावहून भुसावळकडे मोटारीने जात असताना जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोरील पुलाजवळ हल्लेखोरांनी त्यांची मोटार अडवून गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील रहिवाशांनी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन आदींनी धाव घेतली. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे देण्यात आले. बारसे व राखुंडे यांच्या समर्थकांचा रुग्णालयात जमाव जमला होता. कोणताही अनुचित प्रकार होऊन नये यासाठी भुसावळ शहरात पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. सकाळपासूनच दुकाने बंद असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : मतमोजणीत पारदर्शकतेसाठी धडपड; नाशिक, दिंडोरीतील उमेदवारांच्या हाती यंत्राचे अद्वितीय क्रमांक

दरम्यान, शहरातील भारतनगर भागातही संशयितांनी रात्री साडेनऊच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. यावेळी संशयितांच्या दुचाकीचीही जमावाने तोडफोड केली. संतोष बारसे हे माजी नगरसेवक असून, त्यांच्या पत्नी सोनी बारसे यांनी उपनगराध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांचे वडील मोहन बारसे यांचीही याआधी हत्या झाली आहे. सुनील राखुंडे हेही काही वर्षांत भुसावळ शहरात चर्चेत आले होते. त्यांनी सामाजिक कार्यात नावलौकिक मिळविला होता. आगामी काळात ते राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

हेही वाचा : नाशिक: खोदकामामुळे अंबडमध्ये गॅस वाहिनीला गळती

बारसे व राखुंडे यांच्या मोटारीत आणखी कोण होते , कोणत्या कारणातून हत्या झाली, हल्लेखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय, या सर्व बाबी तपासातून निष्पन्न होतील. स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची पथके नियुक्त करीत ती हल्लेखोरांच्या शोधार्थ पाठविण्यात आली आहेत.

डॉ. महेश्वर रेड्डी (जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव)

Story img Loader