धुळे : धुळे तालुक्यातील बाळापूर येथे शेतशिवारात मधमाश्यांनी हल्ला केल्याने संरक्षणासाठी नाल्यात उडी घेतलेल्या वृद्धाचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. पिरण राजधर पाटील (६०) हे नरेश पाटील, दुर्गेश पाटील आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यासह कामानिमित्त शेतात गेले होते. काम करत असताना अचानक पिरण पाटील यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांनी त्यांना डंखही केला.
हेही वाचा : भाजपचे नाशिक लोकसभेच्या जागेवर लक्ष, दिंडोरी मतदार संघापासून प्रदेशाध्यक्ष दूर
संरक्षणासाठी शेताजवळील नाल्यात पिरण यांनी उडी घेतली. नाल्याच्या पाण्यात ते बेशुध्द पडले. त्यांना पाण्यातून बाहेर काढून धुळे येथील हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रिना शाहू यांनी तपासणी करून पिरण पाटील यांना मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.