धुळे : दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ प्रकरणी जिल्ह्यातील १५ दूध विक्रेत्यांवर कारवाई करुन ९४६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केल्याची माहिती दूध भेसळ नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ.अमित पाटील यांनी दिली. दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोहीम राबविण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मोहिमेत शहरात आणि शहरालगतच्या ग्रामीण भागातील दूध संकलन करुन विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले यांचेकडील दुधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाद्वारे करण्यात आली. या कारवाईत ३० दूध विक्रेत्यांच्या सरासरी २७ हजार ७०२ लिटर दुधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची तपासणी केली असता, त्यापैकी १५ विक्रेत्यांच्या काही दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, मृत किटक, अस्वच्छता, गंजलेली दूध हाताळणी भांडी आढळून आली. भेसळयुक्त ९४६ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

हेही वाचा : भुसावळमध्ये पाच टनांपेक्षा अधिक रसायनमिश्रित खवा जप्त; दोघांना अटक

दरम्यान, वैध मापनशास्त्र विभागासोबत संयुक्त पथकाद्वारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र यांच्या मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली असता, १३ दूध विक्रेत्यांच्या डेअरीमधील वजन-मापे ही मुद्रांकन व पडताळणी उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने खटले नोंदविण्यात आले आहेत. दूध भेसळ संदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, धुळे कार्यालयाच्या ईमेलवर किंवा ०२५६२-२३५९२४ याव्दारे किंवा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, चक्करबर्डी रोड, धुळे येथे माहिती कळवावी, असे आवाहन दूध भेसळ नियंत्रण समितीच्या पथकाद्वारे करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule 946 litres adulterated milk destroyed by milk adulteration control committee action taken against 15 milk sellers css