धुळे येथील इन्डो अमाईन्स लिमिटेड कंपनीतील उत्पादनाबाबत खोटी तक्रार करण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागून एक लाख रुपये स्वीकारल्याच्या आरोपाखाली रिपाइं (ए) गटाचा उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर याच्याविरुध्द मोहाडी नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील अवधान येथील औद्योगिक वसाहतीतील युनिट जे-५ मध्ये इन्डो अमाईन्स लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीचे प्रकल्पप्रमुख शिरीष गोसावी (४९) यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, नऊ फेब्रुवारीनंतर इन्डो अमाईन्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात वाल्मिक दामोदरने मोहाडी पोलिसात आणि इतर प्राधिकरणांकडे तक्रारी केल्या. या कंपनीकडून अमोनिया आणि मिथेनॉलचा बेकायदेशीर वापर केला जात असल्याची खोटी तक्रार त्याच्याकडून करण्यात आली.

२४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे सादर केलेल्या पत्रात वाल्मिक दामोदरने कंपनीत अमोनिया, मिथेनॉल व इतर स्फोटक रसायनांचे अनाधिकृत उत्पन्न सुरु असल्याचा खोटा आरोप केला. त्यानंतरही त्याने सातत्याने विविध शासकीय व नियामक संस्यांकडे कोणताही पुरावा नसताना खोट्या तक्रारी व बदनामी करणे सुरु ठेवले. कंपनीकडे सुरुवातीला त्याने पाच कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दोन कोटी रुपये तरी द्यावेच लागतील, असे त्याने धमकावले.

खंडणीची रक्कम देण्याची इच्छा नसतानाही अखेर शिरीष गोसावी यांनी दोन कोटी रुपयांत तडजोड झाल्यावर आगावू रक्कम म्हणून दामोदर यास एक लाख रुपये दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन रिपाइं (ए) गटाचा उपाध्यक्ष वाल्मिक दामोदरविरुध्द मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील उद्योजकांकडून कोणीही खंडणीची मागणी केल्यास आणि उद्योजकाला हेतूपुरस्सर कोणी त्रास देत असेल तर अशा उद्योजकांनी, व्यापाऱ्यांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. संबंधितांना तत्काळ न्याय दिला जाईल.- श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक,धुळे)