धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून शिंदखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम यंत्र कापून पाच ते सहा लाख रुपये लंपास करण्यात आले. रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शिंदखेड्याचे निरीक्षक दीपक पाटील, ठसेतज्ज्ञ यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय खैरे, धनंजय मोरे, हर्षल चौधरी, संजय पाटील यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा तपास यंत्रणेकडून केला जात आहे. चोरांच्या तपासासाठी पोलिसांनी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : धुळ्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ
पैशांसाठी एटीएम यंत्रच कापण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुटखा तस्करी, घरफोडी, जबरी चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. धुळे शहरात बंद घरांना चोरांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याने रहिवासी आता घर बंद करुन बाहेरगावी जाणे टाळू लागले आहेत. घरात कोणाला तरी ठेवणे भाग पडत आहे. पोलिसांचा दरारा निर्माण होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.