धुळे : महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे येथील संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी राजे पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी चबुतराचे काम अपूर्णावस्थेत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने चबुतर्यासह सुशोभिकरणाचे काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष नाना कदम यांनी दिला आहे. देवपूरमधील संभाजी उद्यानात सोमवारी संभाजी राजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नाना कदम यांचेसह प्रदीप जाधव, अर्जुन पाटील, अॅड.नितीन पाटील, अॅड.दिनेश काळे, कोमल आभाळे, अॅड.नामदेव मोरे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा : मखमलाबाद परिसरात बिबट्याचा वावर; रहिवाशांमध्ये भीती
कदम यांनी, प्रखर संघर्षानंतर दोन जुलै २०१५ रोजी छत्रपती संभाजी राजे स्मारकासाठी तत्कालीन मनपा प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतर संबंधित कामे होत नसल्याचे निदर्शनास येताच १४ मे २०२३ रोजी आंदोलनही करण्यात आले. समितीने मंत्रालयीन स्तरावर २१ परवानग्या मिळविल्या. तत्कालीन मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाने याकामी २५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला. त्यानंतर मनपात सत्तांतर झाले. नव्या सत्ताधाऱ्यांनी नवीन अर्थसंकल्पात २१ लाखांची तरतूद करून कामाला चालनाही दिली.
हेही वाचा : नाशिक: लखमापूरमध्ये दुकानांना आग
तसेच १६ जानेवारी २०२१ रोजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ई-निविदा काढत कामाला सुरूवात झाली. शिल्पकार सरमद पाटील यांनी एक हजार २०० किलो वजनाचा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तयार केला. आजमितीस सहा महिने उलटले तरी मनपाने प्रतिसाद दिलेला नाही. यासंदर्भात अनेक बैठका करून विनंत्या करण्यात आल्या. तरीही संभाजी उद्यानातील चबुतरा उभारणीसह आवश्यक बांधकाम अपूर्णावस्थेत आहे. सदर काम पुर्णत्वास नेण्यासाठी १४ जुलै २०२३ रोजी निवेदन देण्यात आले. मात्र, प्रशासनाने चालढकल केल्याचे कदम यांनी सांगितले.