धुळे : शहरातील वलवाडीसह इतर भागात पुरवठा केलेल्या पाण्याचे प्रत्येकी तीन नमुने शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी तत्काळ न दिल्यास सक्षम न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा ग्राहक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. चंद्रकांत येशीराव यांनी दिला आहे.
महापालिकेचे आयुक्त, मुख्य अभियंता आणि आरोग्य अधिकारी यांना ॲड.येशीराव यांनी नोटीस बजावली आहे. महापालिकेचे प्रमुख अधिकारी म्हणून धुळेकरांच्या समस्या सोडविणे, विविध वस्तु व सेवा पुरविण्याची आपली जबाबदारी असताना कर्तव्यात वेळोवेळी कसूर केल्याचा आरोप आयुक्तांना दिलेल्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. महापालिकेने धुळेकरांना नियमितपणे पाणी पुरवठा केलेला नाही. वर्षभरात ४० ते ४८ दिवस पाणी पुरवठा केला असतांना पाणीपट्टी वर्षभराची वसूल केली आहे. दुषित पाण्याचे नमुने घेऊन नागरिकांनी अनेकवेळा निवेदनेही दिली आहेत. त्यानंतरही महापालिकेने या तक्रारींची दखलही घेतली नाही. शहरातील विविध भागात पुरवठा केलेल्या पाण्याची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेतून करण्यात आलेली नाही, असा आरोप येशीराव यांनी केला आहे.
हेही वाचा… धुळे पालिका अकार्यक्षम… महापौर, माजी महापौरानंतर आता आमदार फारुक शाह यांचा उपोषणाचा इशारा
हेही वाचा… लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग अव्वल! नाशिक पहिल्या तर पुणे द्वितीय स्थानावर
वलवाडी शिवारातील सुमारे चारशे वसाहतीतील ५० हजार रहिवाशांना दुषित पाणी पुरवठा झाला असून महानगरातील प्रत्येक प्रमुख भागात पुरवठा केलेल्या पाण्याचा नमुना शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणीस पाठवून या अहवालाच्या प्रति नागरिकांसाठी जाहिर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.