धुळे : वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अनेक अल्पवयीन मुले भरधावपणे वाहन चालविताना दिसतात. त्यांचा हा भरधावपणा काही वेळा अपघातासही कारणीभूत ठरतो. त्यामुळे परवाना नसताना वाहन चालविणाऱ्या १२ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांविरुध्द शहर वाहतूक शाखेने कारवाई करीत त्यांच्या पालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पाल्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहन दिल्यास आपणासही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिला आहे.
हेही वाचा… गौण खनिज अवैध वाहतूक रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीचा अनोखा निर्णय
शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी अनेक पालक आपल्या पाल्यांना दुचाकी किंवा चारचाकी वाहने सर्रासपणे देतात. ही वाहने चालविण्याचा त्या मुलांकडे परवाना नसतो. तरीही मुले ती वाहने भरधाव चालवितात. यातून अपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी असे अनेक अपघात शहरात घडले आहेत. यामुळे परवाना नसताना मुलांना वाहने देणे धोक्याचे आहे. परंतु, तरीही पालक पाल्यांच्या ताब्यात वाहन देत असल्याने शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरु केली. सहायक निरीक्षक कोते यांनी शुक्रवारी कालिका माता मंदिराजवळ थांबून शाळेत व महाविद्यालयात वाहन घेऊन जाणार्या विद्यार्थ्यांना अडविले. यावेळी १२ विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे निरीक्षक कोते यांनी मुलांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. यापुढे आपल्या पाल्यांना वाहन परवाना नसताना वाहने देऊ नयेत, अशी सूचना केली.