धुळे : बहुचर्चित नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील रवींद्र पाटील (५७, रा. वेळोदा, चोपडा) हे शहरात बेवारस स्थितीत आढळल्यानंतर त्यांना सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. ही बातमी गौतमीपर्यंत पोहोचल्याने त्यांनी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्यापर्यंत पोहोचवावे, अशी साद घातली.
दोन दिवसांपूर्वीच गौतमीचे वडील शहरातील अजळकर नगर भागात बेवारस स्थितीत आढळले. त्यांना येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. गौतमीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. परंतु, पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने ते बोलू शकले नाहीत. ही घटना गौतमीला माध्यमांमधून समजल्यानंतर तिने नातेवाईकांशी संपर्क साधून वडिलांना खासगी रुग्णालयात हलविण्याचे सुचविले.
गौतमीच्या नातेवाईकांनी पाटील यांना शुक्रवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात हलविले. शनिवारी गौतमीची मावशी सुरेखा पाटील या धुळ्यात आल्या. त्यांनी रवींद्र पाटील यांची भेट घेतली. त्यांनी पाटील यांना सोबत घेऊन पुण्याकडे निघण्याची तयारी केली. कौटुंबिक कलहातून गौतमीच्या आईने तिच्या वडिलांपासून दूर राहणे पसंत केले होते, असे सांगितले जाते. गौतमीने वडिलांच्या उपचाराचा खर्च केला असल्याची माहिती गौतमीच्या मावशीने दिली.