धुळे : देवपूर बस स्थानकात बसलेल्या तरुणींसमोर एका गाण्यावर रिल बनवतांना अश्लील हावभाव करुन नाचणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या प्रकाराबाबत भाजप महिला आघाडीच्या तक्रारीनंतर त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्या युवकाला तरुणींची माफी मागायला लावत उठबशा काढायला लावल्या. तरुणाविरुध्द देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा… मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळला, इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प
विविध गाण्यांवर रिल बनवून समाजमाध्यमात टाकण्याचा प्रकार एका युवकाच्या अंगाशी आला. राज पवार (१९) या तरुणाने देवपूर बस स्थानकात बसची वाट पाहत बसलेल्या तरुणींसमोर एका गाण्यावर रिल बनविला. ते करताना मुलींची छेड काढल्याचा प्रकार या रिलमधून दिसत होता. रिल समाजमाध्यमात प्रसारीत झाल्याने याबाबत भारतीय महिला आघाडीच्या मायादेवी परदेशी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलिसांना या तरुणाचा शोध घेण्यास सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी राजचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. यावेळी अधीक्षक धिवरे यांनी स्वतः राजला पुन्हा त्याच देवपूर बसस्थानकात नेले. यावेळी राजने त्या ठिकाणी मुलींच्या समोर उठबशा काढून आणि कान धरुन त्या मुलींची माफी मागितली. यानंतर शुभम मतकर यांने दिलेल्या फिर्यादीवरुन राजविरुध्द देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.