धुळे : तालुक्यातील बोरकुंड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून गुरुवारी पहाटे पुन्हा एका नऊ वर्षाच्या बालकावर हल्ला केला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पाच पिंजरे, पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यात दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी एकटे फिरू नये, वृद्ध, बालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपवन संरक्षक नितीन सिंग यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश नानसिंग दुडवे (वय नऊ वर्ष, रा.मोघन,धुळे) असे गंभीर जखमी बालकाचे नाव आहे. रमेश पहाटे प्रात:विधीसाठी गेला असता बिबट्याने हल्ला केला. रमेशची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या पाच दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात दीदी पावरा (आठ महिने, रा.नंदाळे धुळे), स्वामी रोकडे (पाच वर्ष, बोरकुंड, धुळे) या बालकांचा मृत्यू झाला आहे. लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे बोरकुंड परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वन विभागाच्या ५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पाच सीसीटीव्ही कॅमेरे, पिंजरे आणि वाहनांसह या भागात ठाण मांडून आहेत.

हेही वाचा : नाशिक : कांदा दरात उसळी; एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ

नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदुकीसह अन्य सामग्री नाशिक,जळगाव येथून उपलबध झाली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी रात्री, पहाटे जंगल परिसराकडे जाऊ नये, विशेषतः लहान मुले,वृध्दांनी काळजी घ्यावी. प्राणघातक बिबट्या अद्याप पिंजऱ्यात आलेला नसल्याने संभाव्य धोका टाळावा. वन विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करून बिबट्याला लवकरच बंद करेल. अशी माहिती उपवनसंरक्षक नितीन सिंग यांनी “लोकसत्ता”ला दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule district at borkund a 9 year old boy injured in leopard attack third incident of leopard attack within 5 days css