धुळे – जिल्ह्यातील साक्री आणि धुळे तालुक्यात गुरुवारी सलग दुसर्या दिवशी सायंकाळी वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून साक्री तालुक्यातील दिघावे येथे वीज कोसळून २५ मेंढ्यांचा मृत्यू झाला. साक्री तालुक्यात दिघावे येथे गुरुवारी वादळी वार्यासह पाऊस झाला. गार्यामाळ शिवारात वीज पडून वालचंद गोयकर या मेंढपाळाच्या २५ मेंढ्या मृत्युमुखी झाल्या. दिघावे येथील तलाठी अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मेंढपाळास शासकीय मदत मिळावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

धुळे तालुक्यातील नुकसानीचा आढावा

धुळे तालुक्यातील लामकानी परिसरात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीची जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. लामकानीसह बोरीस,सैताळे, कोठारे, रामी या गावांना वादळाचा तडाखा बसला. शेतकर्यांना सरसकट १०० टक्के नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली. रघुनाथ महाले, चंपूशेठ तलवारे, युवराज परदेशी आदींचे नुकसान झाले.

पालकमंत्र्यांकडून त्वरीत पंचनामा करण्याची सूचना

जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व अवकाळी पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकार्यांना केली आहे. पाऊस, गारपिटीमुळे शेतात काढणीसाठी ठेवलेले गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकर्यांचा कांदा तयार होता. परंतु, अवकाळी पावसामुळे तोही खराब झाला. फळबाग, मका व उन्हाळी पिकांचे देखील नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त गावांची ठाकरे गटाकडून पाहणी

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांना शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) पदाधिकारी, नेत्यांनी भेट दिली. माजी आमदार शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, तालुका संघटक भय्या पाटील, तालुका सन्वयक प्रकाश वाघ, भाऊसाहेब शिंदे, कृष्णा खताळ, देविदास माळी आदींचा यात सहभाग होता. धुळे तालुक्यातील प्रामुख्याने कावठी, नेर, नवे भदाणे, मेहेरगाव, नवलाने, लोणखेडी, लोहगड, देऊर नांद्रे भागात झालेल्या पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी यांच्याबरोबर जाऊन पदाधिकार्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून घेतले. बहुतेक शेतातील मका,ज्वारी, बाजरी,गहू,पपई,कांदे आणि फळबागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.