धुळे : लाल दिव्याच्या गाडीतून ते आले. जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याची गाडी अडवत देयकात चूक असल्याचे सांगितल्याने व्यापाऱ्याची गाळण उडाली. दंडापोटी रक्कम ऑनलाईन देण्यात आली. अशाप्रकारे इतरही व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. दंडाची ही रक्कमच तब्बल ७१ लाख ३३ हजार ९८४ रुपये झाली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर महिलेसह दोघा पोलिसांना अटक झाली. हे तिघेही बनावट जीएसटी अधिकारी निघाले. या बनावट जीएसटी अधिकार्यांनी फसवणूक केलेल्या व्यापार्यांनी आझाद नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
हेही वाचा…नारायण सुर्वे यांच्या संकल्पनेतील ‘माझे विद्यापीठ’ साकारण्यात अडथळे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कश्मिरसिंग बाजवा (५९, विकास कॉलनी, पतियाला,पंजाब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन ते चार व्यक्तींनी लाल दिव्याच्या गाडीत येवून वाहन अडवले. चालकाला आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून वाहनातील मालाच्या पावत्यांची मागणी केली. यावेळी देयकात संस्थेच्या नावात चूक असल्याचे सांगून बनावट जीएसटी अधिकाऱ्यांनी काश्मिरसिंग यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. कश्मिरसिंग यांच्याकडे दंडापोटी १२ लाख ९६ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत ही रक्कम एक लाख ३० हजार रुपयांपर्यंत आली. गुगल पेद्वारे रक्कम स्विकारून कश्मिरसिंग यांची फसवणूक केली. याप्रकरणी चार जानेवारी रोजी कश्मिरसिंग यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपास सुरु केला. सहायक अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी व निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना सूचना दिल्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. या पथकाने गुन्ह्याची पद्धत व तांत्रिक विश्लेषणावरून स्वाती पाटील (रा. नाशिक), बिपीन पाटील, इम्रान शेख (दोन्ही रा. धुळे) हे संशयित असल्याचे निश्चित केले. पैकी बिपीन आणि इम्रान हे धुळे पोलीस विभागात आहेत. या तिघांनाही ३१ जानेवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्याची माहिती घेण्यात आली. तिघा संशयितांनी कश्मिरसिंगसह अन्य व्यापार्यांकडून तब्बल ७१ लाख ३३ हजार ९८४ रुपयांची रक्कम उकळून फसवणूक केल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर संशयित फरार असल्याची माहिती अधीक्षक धिवरे यांनी दिली.
हेही वाचा…तृतीयपंथीयांसाठी रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्याची सूचना, विभागीय दक्षता नियंत्रण समितीची बैठक
ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी बाळासाहेब थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे व संदीप पाटील, खालीदा सय्यद, योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, योगेश शिंदे, मुक्तार मन्सुरी, गौतम सपकाळे, मकसुद पठाण, अनिल शिंपी, पंकज जोंधळे, सचिन जगताप, सिद्धार्थ मोरे, धिरज काटकर, वंदना कासवे, दत्तात्रय उजे, किरण कोठावदे, महेंद्र भदाणे व निलेश पाकड यांच्या पथकाने केली.