धुळे : फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे गुंतविल्यास दुप्पट लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवित अनेकांकडून ५८ लाख ७५ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पती-पत्नीसह सात जणांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ए. एम.पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हरिश जंगले (३२, शिवाजीनगर, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे, ह.मु. भुसावळ, जि. जळगाव), शितल जंगले, मधुकर पाटील, नीलिमा पाटील, जितेश पाटील (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), मनोज जंगले (प्लॉट नं. ८, गणेश कॉलनी, भुसावळ, जि. जळगाव) या सात जणांनी फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे गुंतविल्यास भरपूर लाभांश मिळेल, असे आमिष दाखवित लोकांचा विश्वास संपादन केला.
हेही वाचा : भुसावळमध्ये पाच टनांपेक्षा अधिक रसायनमिश्रित खवा जप्त; दोघांना अटक
या अमिषाला भुलून काही जणांनी २२ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ५८ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम या संशयितांकडे दिली. हे पैसे फॉरेक्स करन्सी मार्केट कंपनीत न गुंतविता संशयितांनी अपहार केला, अशी तक्रार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.