धुळे : अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याने आज ८० टक्के क्षमतेने अक्कलपाडा योजना सुरु आहे. येत्या काही दिवसात शंभर टक्के क्षमतेने योजना सुरु होईल. त्यानंतर महिनाभरात धुळेकरांना दोन दिवसाआड पिण्याचे पाणी मिळेल, अशी माहिती आमदार फारुक शाह यांनी दिली. कोणी या योजनेचे श्रेय घेऊ नये, आपण जे बोलतो ते करतो, असा टोला शाह यांनी भाजप नेत्यांना लगावला.
शाह यांनी नकाणे तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, अभियंता चंद्रकांत उगले, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धुळेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावू लागू नये म्हणून आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. हरण्यामाळ तलावाच्या माध्यमातून नकाणे तलाव भरला जावा अशी मागणी आहे. मनपा आयुक्त दगडे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नकाणे तलाव भरण्याबाबत पत्रही दिले आहे. त्यामुळे नकाणे तलाव लवकरच हरण्यामाळ तलावातून भरण्यात येईल.
हेही वाचा : आग विझविण्यासाठी आता ९० मीटर उंचीची शिडी, नाशिक मनपा सभेत मान्यता
धुळेकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. योजनेसाठी पाठपुरावा केला. या योजनेचे श्रेय घेण्यासाठी भाजपमधील काही नेते, पदाधिकारी धडपड करीत आहेत. त्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, असे शाह यांनी म्हटले आहे.