धुळे : खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे शेत जमिनीच्या कागदपत्रात फेरफार करून दोघांच्या नावे शेत जमीन केल्याप्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह आठ जणांविरुध्द निजामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पंढरीनाथ महिरे (निजामपूर, साक्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीबेन बिरारे यांचे दुसर्याशी लग्न झाले असतांनाही त्यांनी खोटे नाव लावले. सखूबेन बिरारे यांनी खोटे जन्म प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे बनवले. ते संबधितांकडे सादर केले.
तत्कालीन तलाठी पुंजू बैसाणे यांच्या मार्फत वारस नोंद करण्याबाबतची माहिती दिल्यावर कोणत्याही प्रकारची खात्री न करता बैसाणे यांनी नोंद दाखल केली. तत्कालीन मंडळ अधिकारी एन. एन. मरसाळे यांनी १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावरील अक्षरात बदल व त्यावर गट क्रमांक नाही हे स्पष्ट दिसत असतांना देखील त्याची चौकशी किंवा खात्री केली नाही.
हेही वाचा : नाशिकमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदे, टोमॅटोफेक
या संपूर्ण प्रक्रियेत फेरफार नोंद करुन शेत जमीन लक्ष्मीबेन बिरारे आणि सखूबेन बिरारे यांच्या नावे करुन दिली. असा आरोप आहे. या तक्रारीवरुन तत्कालीन मंडळ अधिकारी मरसाळे (निजामपूर, साक्री), तत्कालीन तलाठी पुंजू बैसाणे (रा.धुळे) यांसह लक्ष्मीबेन बिरारे, सखूबेन बिरारे, जयभिल झुलाल (रा.सायला,गुजरात), मनीलाल महिरे, प्रदीप ठाकरे, दाजभाऊ पिंगळे (सर्व रा.आखाडे,.साक्री) यांच्याविरुध्द निजामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.