धुळे : दिल्लीहून भाजीपाल्याच्या रिकाम्या क्रेटमधून २० लाख रुपयांची दारू नेतांना दोघांना शिरपूर पोलिसांनी पकडले. शिरपूरमार्गे गुजरात राज्यात दारूची तस्करी होत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. पोलिसांनी दोघांकडून वाहनासह ५५ लाख ३७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. रामरूप जाटाब (२८) आणि कृष्णकुमार गुर्जर (२२) ही संशयितांची नावे आहेत. दोघेही राजस्तानातील ढोलपूर येथील रहिवासी आहेत.

गुजरात येथे दारूची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्यासह पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील गोल्ड फॅक्टरी समोरील (शहादा चौफुली) पुलाखाली सापळा रचला. मध्य प्रदेशातील सेंधवाकडून येणारे मालवाहू कंटेनर थांबवून तपासणी केली असता वाहनात भाजीपाल्याचे रिकामे क्रेट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा : कांदा व्यापाऱ्यांकडून सरकारची कोंडी; परवाने जमा, पर्यायी व्यवस्थेचा विचार

चालक आणि सहचालकाला वाहनात आणखी काही आहे का, अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. रिकामे असलेले क्रेट काढून तपासणी करण्यात आली असता क्रेटखाली प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये दारूचे खोके दिसले. वाहनात सापडलेली सर्व दारू गणपती उत्सवानिमित्त गुजरातमध्ये छुप्या मार्गाने नेली जात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader