धुळे : गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या विक्री करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख तीन हजार रुपयांच्या ५८० बाटल्या आणि पाच हजार १०० गोळ्या जप्त करण्यात आल्या. मोहाडी उपनगरातील एक व्यक्ती गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानुसार निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोहाडी उपनगरातील दंडेवाले बाबा नगरातील विकास उर्फ विकी चौधरी (३६, रा.दंडेवाले बाबा नगर, मोहाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्या घरात गुंगीकारक औषधांच्या बाटल्या गोळ्या मिळून आल्या. त्याने देवपूर भागातील लुकेश चौधरी (३०, रा.विष्णूनगर, धुळे) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. या बाटल्या देवपूरमधील प्रमोद येवले (४३, देवपूर, धुळे) यांच्या औषध दुकानात व घरी असल्याची माहिती लोकेशने पोलिसांना दिली.

हेही वाचा : केंद्राचे पीक पाहणी पथक मालेगाव तालुक्यात, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली नाराजी

त्यानंतर येवलेलाही ताब्यात घेण्यात आले. मुकेश पाटील (३५, रा.वाडीभोकर, धुळे) या वैद्यकीय प्रतिनिधीकडून खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी मुकेशलाही ताब्यात घेतले. चौघांकडून गुंगीकारक औषधांच्या ५८० बाटल्या आणि पाच हजार १०० गोळ्या, असा एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चौघांविरुध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule stock of narcotics seized by police case registered against four css