धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडी उमेदवाराच्या शोधात असतानाच महायुतीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला आहे. माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुर रहमान हे वंचितचे उमेदवार आहेत. रहमान यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, काँग्रेसकडून अनिश्चितता लक्षात घेत वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवार जाहीर केली आहे.
बिहारमधील पश्चिम चंपारणचे अब्दुर रहमान हे १९९७ च्या तुकडीचे आयपीएस असून त्यांनी महाराष्ट्र केडर मिळाल्यावर जिल्हा सहायक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष महानिरीक्षक, महानिरीक्षक अशा पदांवर सेवा बजावली आहे. २०१९ मध्ये सीएए हा कायदा केंद्र सरकारने मंजूर केल्यावर त्यास असंविधाननिक आणि कलम १४ चे उल्लंघन होत असल्याचे म्हणत त्या विरोधात रहमान यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी ‘एब्सेंट इन पॉलिटिक्स ॲण्ड पावर, पॉलिटिकल एक्सक्लूज़न ऑफ इंडियन मुस्लिम्स’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाची चर्चा मुस्लीम बुद्धिजीवी वर्गात होऊ लागली आहे.
हेही वाचा : “नाशिकच्या जागेवरुन वेगळी विधाने करणे अयोग्य”, राधाकृष्ण विखे यांचा भुजबळ यांना टोला
धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहर आणि तालुका यांचा समावेश असून या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांचे प्रमाण अधिक आहे. यामुळेच वंचित आघाडीने रहमान यांना उमेदवारी दिल्याचे म्हटले जात आहे. रहमान यांची उमेदवारी मविआसाठी चिंतेचा विषय आहे.