नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना तुतारी वाजविणारा माणूस हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षचिन्ह मिळाले असताना चिन्ह वाटपात अपक्ष उमेदवार बाबू भगरे (सर) या अपक्ष उमेदवारास तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. नामसाधर्म्य आणि तुतारी चिन्ह यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे याच मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या नावाशी काहिसे साधर्म्य साधणारे भारत पवार नामक उमेदवार रिंगणात आहे.
माघारीनंतर नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघातील अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. नाशिक लोकसभा मतदारसंघात ३१ तर दिंडोरीत एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आणि वंचितच्या मालती थवील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी बहुजन समाज पार्टीसह अन्य पक्षांचे चार आणि तीन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह आहे. भास्कर भगरे यांना ते चिन्ह मिळाले. तर याच मतदारसंघात रिंगणात उतरलेले बाबू सदू भगरे (सर) या उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले आहे. भगरे हे आडनाव पुढे (सर) ही ओळख आणि तुतारी चिन्ह यामुळे मतदानावेळी मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या नावाशी काहिसा साधर्म्य साधणारा एक उमेदवार रिंगणात आहे. बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे भारत पवार नामक उमेदवाराला ॲटो रिक्षा हे चिन्ह मिळाले. या मतदारसंघात बसपाचे तुळशीराम खोटरे (हत्ती), किशोर डगळे (कोट), गुलाब बर्डे (बॅट), मालती ठोमसे (गॅस सिलिंडर), अनिल बर्डे (कुलर), जगताप दीपक (शिट्टी) अशी चिन्ह मिळाली आहेत. उमेदवारांकडून चिन्हांचा पसंतीक्रम घेण्यात आला होता. त्यानुसार चिन्हांचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा : ‘गंगापूर’च्या गाळातून विकासकांचे भले? शेतकऱ्यांना डावलल्याने गाळ काढण्याचे काम बंद करण्याची मागणी
पक्षचिन्ह पोहोचविण्यासाठी १२ दिवस
नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या मोठी असल्याने विशिष्ठ काही चिन्ह मिळवण्यासाठी स्पर्धा झाली. गॅस सिलिंडर चिन्हांची तीन उमेदवारांनी मागणी केली होती. सोडतीद्वारे हे चिन्ह वंचित’चे उमेदवार करण गायकर यांना मिळाले. त्यामुळे नाशिक व दिंडोरीतील वंचित आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलिंडर हे एकसारखेच चिन्ह मिळाले आहे. या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गटाचे) हेमंत गोडसे यांना पक्षाचे धनुष्यबाळ तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मशाल हे चिन्ह मिळाले आहे. बसपाचे अरुण काळे यांना हत्ती चिन्ह मिळाले. शांतिगिरी महाराजांना बादली तर सिध्देश्वरानंद सरस्वती यांना संगणक हे चिन्ह मिळाले. या शिवाय अन्य उमेदवारांना शिवण यंत्र, सोफा, तुतारी, ट्रे, रोड रोलर, सफरचंद, काडेपेटी, खाट, बॅट, टेबल, इस्त्री, फुगा, ॲटोरिक्षा, ऊस शेतकरी, शिट्टी, हिरा, द्राक्षे, कोट, किटली, प्रेशर कुकर, अशी चिन्हे मिळाली आहेत. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी आहे. संपूर्ण मतदारसंघात आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी त्यांना बरीच धडपड करावी लागणार आहे.