नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीच्या चार घटनांमध्ये ३० लाखाहून अधिकचा ऐवज लंपास झाला. कॅनडा कॉर्नर भागात सुमंगल सोसायटीजवळ झालेल्या घटनेत चोरट्यांनी १५ लाखाची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सुमारे २९ लाखांचा ऐवज चोरला.
कॅनडा कॉर्नर भागातील घटनेबाबत श्रेयांक शाह यांनी तक्रार दिली. शाह हे सुमंगल सोसायटीजवळ वास्तव्यास आहेत. ११ जानेवारी रोजी सकाळी ते कुटूंबियांसह मुंबई येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ तारखेला ते रात्री सव्वा आठ वाजता घरी परतले. तेव्हा घरफोडी झाल्याचे कळले. चोरट्यांनी शहा यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडलेले होते. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील दागिने व अडीच किलो चांदीचे शिक्के असे सुमारे १४ लाखाचे दागिने आणि १५ लाख रुपये ठेवलेली तिजोरी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा…नंदुरबार जिल्ह्यातील परिचारिकेच्या हत्येची उकल
दुसरी घरफोडी राठी अमराई भागात भरदिवसा घडली. या घटनेत एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या माय-लेकींची घरे फोडण्यात आली. या बाबत प्रशांत मोगल (श्रीहरीनगर, चोपडा लॉन्सजवळ) यांनी तक्रार दिली. मोगल यांच्या पत्नी आणि शेजारी राहणाऱ्या त्यांच्या आई सोमवारी दुपारी देवदर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी मोगल आणि त्यांच्या सासूचे घर फोडून दोन्ही घरातून सुमारे एक लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व महत्वाची कागदपत्रे चोरून नेली. या घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा…नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
चौथी घटना जुने सिडको भागात घडली. याबाबत पुंडलिक रूले यांनी तक्रार दिली. रूले कुटूंबिय सहा ते १२ जानेवारी या कालावधीत बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून, घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली ८५ हजाराची रोकड चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd