नाशिक : माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील संशयितास गुंडाविरोधी पथकाने गोव्यातून अटक केली. मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत संशयित युवराज पाटील (४२,रा. बेळगाव) याने शेअर मार्केटमधील त्यांचे अक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून ते कंपनीचे दलाल असल्याचे सांगत चार टक्के दराने दरमहा परतावा देण्याचे आमिष दाखविले. माजी सैनिक संजय बिन्नर आणि साथीदारांचा विश्वास संपादन करुन एक कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांना फसविले. त्यामुळे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : वंचिततर्फे रावेरमध्ये संजय ब्राह्मणे मैदानात

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सुचनेनुसार गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुंडा विराेधी पथकास आदेश देण्यात आले. पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करुन संशयित हा कर्नाटक, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अरूणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात ओळख लपवत फिरत असल्याची माहिती मिळवली. सध्या तो गोवा राज्यात असून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर पथकाने पणजी येथे जावून संशयित युवराज पाटील याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून निरनिराळ्या कंपनीचे सात भ्रमणध्वनी, अंदाजे एक लाख ९० हजार रुपये आणि पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याला पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

Story img Loader