नाशिक : इगतपुरीजवळील तळेगाव शिवारात एका व्हिलामध्ये जुगार खेळणाऱ्या १९ जणांविरुध्द इगतपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यापैकी १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांमध्ये सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शकांसह मुंबई, ठाणे, नाशिक येथील बड्या व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांनी १९ लाख रुपये हस्तगत केले आहेत. .

तळेगाव शिवारातील मिस्टीक व्हॅली परिसरात न्युयॉर्क व्हिला आहे. याठिकाणी शुक्रवारी रात्री जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल तसरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्यरात्री छापा टाकला. त्यावेळी काही जण जुगार खेळतांना तर काही जण विदेशी महागडे मद्य प्राशन करतांना आढळून आले. जुगार खेळणाऱ्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १८ लाख ७९ हजार ४५० रुपये मिळून आले. महागड्या मोटारी जप्त करण्यात आल्या.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १९ जणांमध्ये व्हिला मालक शक्ती ढोलकिया (रा. जुहू, सांताक्रुज पश्चिम, मुंबई) याच्यासह मुंबईचे सहा, नाशिक पाच, ठाणे चार, इगतपुरी दोन, नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

न्यूयॉर्क व्हिला येथून १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. हे संशयित अवैधरित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैसे लावून जुगार खेळतांना आणि खेळवितांना मिळून आले. या ठिकाणावर देशी-विदेशी मद्यही मिळाले. – राहुल तसरे (निरीक्षक, इगतपुरी पोलीस ठाणे)

Story img Loader