जळगाव : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले असून, त्याची प्रत्यक्ष कार्यवाही देखील सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने जळगाव पोलीस प्रशासनाने कसून चौकशी केली असता, शहरात पर्यटक व्हिसा वापरून पाकिस्तानातून ३२७ नागरिक आले असल्याचे निदर्शनास आले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलत काही निर्णय घेतले. त्यानुसार, भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत देश सोडावा लागणार आहे. संबंधित नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची असलेली परवानगी देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेला व्हिसा रद्द मानला जाणार आहे.

सार्क व्हिसा सवलत योजनेद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यामुळे तत्काळ परत जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव पोलीस प्रशासनाने कसून चौकशी केली असता, सार्क व्हिसा सवलतीचा लाभ घेऊन पाकिस्तानातून जळगावात एकही नागरिक दाखल झाला नसल्याचे आढळून आले. मात्र, पर्यटक व्हिसा घेऊन जळगावात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या सुमारे ३२७ इतकी असल्याचे उघड झाले. त्यापैकी १२ नागरिकांनी त्यांच्या जवळील व्हिसाची मुदत वाढवून मिळावी, यासाठी अर्ज केला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, सध्या शहरात पर्यटक व्हिसा वापरून दाखल असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे सांगण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यासंदर्भात आदेश प्राप्त होताच पुढील कारवाई सुरू करण्यात येईल, असे पोलीस अधिकारी नखाते यांनी नमूद केले.