जळगाव – जिल्ह्यातील पाचोऱ्यात मालमोटार चालकाकडे पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणात सहायक फौजदारासह दोन पोलिसांना मार्च महिन्यात निलंबित करण्यात आले होते. याशिवाय शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी गेल्या आठवड्यात २० हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकले होते. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलीस अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून हप्ते वसूल करत असल्याचे आणि उपनिरीक्षकाने ड्रग्ज प्रकरणातील आरोपीशी संबंध ठेवल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षकासह दोन्ही कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाई केली आहे. गजानन देशमुख आणि संघपाल तायडे हे दोन कर्मचारी गुटखा व पेट्रोल विक्री करणाऱ्या कंडारी (ता.जळगाव) येथील एका दुकानदाराकडून हप्ते वसूल करीत असल्याची चित्रफीत थेट पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आली होती. ती चित्रफीत पाहिल्यानंतर डॉ. रेड्डी यांनी देशमुख याची पाचोरा येथे तसेच तायडे याची फत्तेपूर येथील पोलीस ठाण्यात तडकाफडकी बदली केली आहे.
याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी अंमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यात फरार असलेल्या अरबाज नावाच्या संशयिताशी आपल्या भ्रमणध्वनीवरून तब्बल २५२ वेळा संपर्क साधून संभाषण केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चौकशी करून पोलीस अधीक्षकांनी उपनिरीक्षक पोटे यांना नियंत्रण कक्षात पाठवले असून, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या हप्ता वसुलीवरून दोन कर्मचाऱ्यांची बदली व ड्रग्जच्या गुन्ह्यातील आरोपीशी संबंधावरून उपनिरीक्षकावर उचलबांगडीची कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताच धाक न राहिल्याने जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी सर्रास लाच व हप्तेखोरी करताना आढळून येत असल्याने एकूणच पोलीस दलाच्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोलिसांकडूनच जर गुन्हेगारांना मदत होत असेल तर नागरिकांनी पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा कशी ठेवायची, हा प्रश्न आहे. पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलिसांना वठणीवर आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अलिकडेच, जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकात एका शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये चोरून पळणाऱ्या चार लुटारूंना पोलिसांनी पकडले. त्यांच्या चौकशीत त्यांचा म्होरक्या जालना येथील पोलीस उपनिरीक्षक असल्याचे उघडकीस आल्याने पोलीसही चक्रावले होते.