जळगाव : सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात असून, भाजपने बुधवारी रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा उमेदवारी घोषित केल्याने रावेरसह यावल तालुक्यात उमेदवारीसाठी इच्छुक अमोल जावळे समर्थक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करुन आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात राज्यातील २० उमेदवार घोषित करण्यात आले. जिल्ह्यातील जळगाव व रावेर येथील जागांचे उमेदवार जाहीर केले. त्यात रावेरसाठी खासदार रक्षा खडसे आणि जळगावसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर केले. रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना भाजपची उमेदवारी जाहीर होताच जळगाव, अमळनेरसह जिल्ह्यात जोरदार जल्लोष करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून जयघोष करतानाच एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले.
हेही वाचा…‘मोदी सरकारला हटवणे हेच…’, शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी व्यक्त केला निर्धार
जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हेही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर मतदारसंघात भाजपचे काम अमोल जावळे यांनी केले. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवून पश्चिम जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यानंतर लोकसभेसाठी अमोल जावळे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, भाजपने अमोल जावळेंना डावलून खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा उमेदवारी घोषित केल्याने रावेरसह यावल तालुक्यात जावळे समर्थकांमध्ये असंतोष पसरला. कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत सामूहिकरीत्या आपापल्या पदांचे राजीनामे अमोल जावळेंकडे दिले. कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
यावल तालुक्यातील भालोद गावात जिल्हाध्यक्ष जावळे यांच्या निवासस्थानी ७०० हून अधिक पदाधिकारी, समर्थक रात्रीपासूनच तळ ठोकून होते. पक्षात काम करून काय फायदा, असे सांगत समर्थकांनी नाराजी व्यक्त करुन अमोल जावळेंकडे सामूहिकरीत्या राजीनामे दिले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, भाजप सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, ओबीसी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले.
हेही वाचा…‘जीएसटीमधून शेतकऱ्यांची सुटका करणार’, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधींचं आश्वासन
मुक्ताईनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार रक्षा खडसे यांनी, आपण अमोल जावळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करुन चर्चा केली असून त्यांनी कुठलीही नाराजी नसल्याचे सांगितले आहे. पक्षाने जो आदेश दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पक्षासाठी एकनिष्ठेने काम करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खडसे यांनी नमूद केले. अमोल जावळे हे पक्षाचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदावर आहेत. त्यांच्याकडे जोखमीचे पद आहे, ते रावेरची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास आहे. जावळे हे निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय होतील, पक्षाने दिलेला आदेश पदाधिकारीही पाळणार आहेत, असे पदाधिकार्यांनीही सांगितल्याचा दावा खडसेंनी केला आहे.